TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 9 जुलै 2021 – राज्याचे पावसाळी अधिवेशन एकतर्फी चालवित भाजप आमदाराविरोधात शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचे आरोप करून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केलीय. मात्र, त्यावेळी आपणही सभागृहामध्ये होतो. तसेच एक जबाबदार पक्षाचा प्रमुख म्हणून पीठासीन अध्यक्ष यांना कोणी शिवीगाळ केली? हे योग्य वेळी मी उघड करेन, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निष्क्रीय कारभार भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून उघड केला आहे. त्यामुळे कोरोनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने चर्चेला घाबरून केवळ दोन दिवसाचे राज्याचे विधीमंडळ अधिवेशन ठेवले आणि लोकशाहीला कुलूप बंद करण्याचे काम केलं आहे, असे फडणवीस म्हणाले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, राज्यासमोर अनेक प्रश्‍न आहेत. त्यावर अधिवेशनामध्ये चर्चा होणे अपेक्षित होते. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण होण्यास महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. आम्ही वारंवार शासनाने काय करावे? याबाबत सांगत होतो.

मात्र, आघाडी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आघाडी सरकारला उघडे पाडण्याचे काम विरोधी पक्षाने अर्थात आम्ही केले. या सर्व बाबींबर अधिवेशनामध्ये चर्चा होणे गरज होते. मात्र, करोनाचे कारण पुढे करत सरकारने दोन दिवसात हे अधिवेशन गुंडाळले.

राज्य सरकारने एकतर्फी अधिवेशन चालवून आमच्या आमदारांविरोधात कपाक्‍ल्पित आरोप करुन त्यांचे वर्षभरासाठी निलंबन केलं आहे. ओबीसी आरक्षणाचे मुद्‌द्‌यावरुन सत्तारुढ पक्ष उघड पाडला आहे, त्यामुळे त्यांनी आमच्यावर खोटे आरोप करुन कारवाई केली आहे.

तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच धनगर आरक्षण न मिळण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे, असे सांगत ही आरक्षणे मिळत नाहीत. तो पर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच राहणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना नरेंद्र मोदी सरकारने मंत्री बदलले. पण, डबे बदलून उपयोग नाही. तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवे, अशी बोचरी टीका केली होती. नाना पटोले यांच्या या टीकेला आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिटोला लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते.

नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे. हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्दल होत का? असा प्रतिसवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही असे प्रत्युत्तर दिले आहे.