TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 30 मे 2021 – एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कोरोना काळात भारतातून सुमारे ५८ हजार ७६ कोटींची शेतमालाची निर्यात झाली आहे. त्यात महाराष्ट्राने १३ हजार ८७७ कोटींची निर्यात केली आहे. तसेच द्राक्ष आणि आंबा निर्यातीत राज्याने देशात पहिल्या क्रमांक मिळविला आहे.

देशातील शेतमाल विदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केलाय. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडलेत. राज्यानेही स्वतंत्र निर्यात कक्ष तयार केलाय.

फळे आणि भाजीपाल्यांसाठी ४५ प्रकारच्या संगणकीय यंत्रणा तयार आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना निर्यातक्षम माल तयार करण्यापासून ते परदेशी बाजारपेठ शोधण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत केली जात आहे.

या माध्यमातून कोरोना काळात राज्याने २ हजार २५० कोटींची द्राक्ष निर्यात केली आहे. देशाची द्राक्षांची एकूण निर्यात २ हजार २९० कोटी रुपयांची झाली आहे. राज्याचा त्यातला वाटा ९८.२५ टक्के इतका आहे. केळी आणि आंबा निर्यातीतही महाराष्ट्र आघाडीवर असून अनुक्रमे ४५५ आणि १९२ कोटींची निर्यात झालीय.

राष्ट्रीय स्तरावर या दोन्ही फळांमध्ये राज्याचा वाटा अनुक्रमे ७३.८६ आणि ८९.७२ टक्के इतका आहे. निर्यात कक्षातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फळं आणि भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्राला मोठा वाव आहे.

द्राक्ष वगैरेसाठी प्लॉटची नोंदणी करून मागणी करणारे देश सांगतील त्याप्रमाणे त्याच औषधांची फवारणी करावी लागते. याची शेतकऱ्यांनी सवय करून घेतल्याने तर महाराष्ट्राला शेतमाल निर्यातीत भरपूर वाव आहे, असे निर्यात कक्षचे राज्य सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले आहे.