TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 22 जुलै 2021 – ज्यांनी कोरोना लसचे 2 डोस घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी लोकल प्रवास तातडीने सुरु करावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील एक पत्र ही राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

मुंबईकरांचे दररोजचे हाल थांबविण्याची गरज आहे. यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसचे दोन डोस घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

मागील 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे निर्बंध राज्य सरकारने लागू केलेत. हे निर्बंध आपण सर्वजण पाळत आलोय. पण, आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी? असा प्रश्न पडू लागलाय. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जाताहेत. ते तर अनाकलनीय आहेत.

मुंबईतील सर्व कार्यालय सुरु आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना दररोज अनेक तास प्रवास करावा लागतोय. त्यामध्ये लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. राज्य सरकारने बस सेवेला परवानगी दिली.

पण, लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होतेय. अशा गर्दीमध्ये प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यामुळे नेमकं काय साध्य होणार? या आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहलं आहे.