TOD Marathi

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात हरीश साळवे यूपी सरकारच्या वतीने हजर झाले. या सुनावणीत सरन्यायाधीश एन.व्ही रमण यांनी युपी सरकारला फटकारले आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी यूपी सरकारच्या तपासावर आम्ही समाधानी नाही, असं सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे.

लखीमपूर खेरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरन्यायाधीशांनी हत्या प्रकरणातील आरोपीला वेगळी वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न यूपी सरकारवर उपस्थित केला.

सुनावणीदरम्यान, सीजेआय म्हणाले की मुख्य आरोपीविरोधात अतिशय गंभीर गुन्हा दाखल असून ते न्यायालयात हजर झालेले नाही. यावर साळवे म्हणाले की, “आम्ही त्यांना पुन्हा नोटीस बजावली असून उद्या सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. जर मिश्रा हजर राहिले नाही, तर कायदा त्याचं काम करेल, अशी ताकीद कोर्टाने दिली आहे.