TOD Marathi

नवी दिल्ली: आता रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अर्थात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या द्विमासिक आढावा बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशाची आर्थिक व्यवस्था कमकुवत झाली होती, मात्र आता लसीकरणाचा वेग हळूहळू वाढू लागल्यामुळे अर्थव्यवस्था देखील काहीशी पूर्वपदावर येऊ लागली आहे. याचाच परिणाम म्हणजे बाजारात काही प्रमाणात तेजी दिसू लागली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरणाविषयी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. देशातील रेपो रेट ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, रिव्हर्स रेपो रेट देखील ३.३५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.