TOD Marathi

पाचवी सातवीतली पोरं… अंघोळ करून छान तयार होतात… आपल्या मित्रांचा घोळका करून गावात येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असतात आणि त्या व्यक्तीची भेट घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेनासा होतो… आणि नंतर त्यांच्या एकमेकांसोबत गप्पा सुरू होतात, मी त्यांना भेटलो, त्यांच्यासोबत हँडशेक केला वगेरे वगेरे… हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहिलं…

ही दृश्य होती राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शेगावच्या पुढे यात्रा जळंबच्या आसपास पोहोचताना…

राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा पंधरा दिवस महाराष्ट्रात होती. ‘TOD मराठी’साठी ही यात्रा कव्हर करण्याची संधी मिळाली. राहुल गांधी हे व्यक्तिमत्व कसं आहे, एवढ्या मोठ्या यात्रेचं नियोजन, भारतयात्री, प्रदेश यात्री, सहभागी होणारे लोक, सभा, त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी अगदी जवळून बघता आल्या. त्यांना कव्हर करता आलं. माझ्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता कारण एवढ्या मोठ्या यात्रेसाठी मी पहिल्यांदा या निमित्ताने ग्राउंडवर होतो. या एकूण प्रवासात खूप सुंदर अनुभव आले. यातील एक अनुभव..

राहुल गांधी या व्यक्तिमत्वाबाबत अनेकांच्या मनात कुतूहल आहे, अनेकांच्या मनात अनेक भावनाही आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुत्र असलेले राहुल गांधी कन्याकुमारी ते कश्मीर असा जवळपास 3500 किलोमीटरचा अंतर पायी प्रवास करणार आहेत. (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) या प्रवासादरम्यान ते पंधरा दिवस 382 किलोमीटर अंतर महाराष्ट्रातील पायी चालले. पातुर, बाळापुर, शेगाव, जळंब ते पुढे जळगाव जामोद (Patur Balapur to Jalgaon Jamod route of Bharat Jodo Yatra) या भागात मला ही यात्रा कव्हर करता आली, अनुभवता आली. विविध गावांमध्ये एखादा सण उत्सव असावा अशा प्रकारची सजावट होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर असं लक्षात येत होतं की तो तयार केलेला इव्हेंट नव्हता, ते त्यांनी स्वतःहून केलेलं नियोजन होतं. युवक-युवती, महिला, जेष्ठ नागरिक, छोटे छोटे मुलं, अशी सगळी मंडळी राहुल गांधींच्या स्वागतासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक होती. राहुल गांधी पातुरहून पुढे निघाल्यानंतर रस्त्यात अनेक लोकांना भेटत होते. वेगवेगळ्या घटकांशी ते संवाद साधत होते, त्यांच्या समस्या जाणून घेत होते. भारत देशात विविध ठिकाणी राहणीमान, खानपान, शेती, संस्कृती अशा सगळ्या गोष्टींमध्ये वैविध्य पाहायला मिळतं. या सगळ्या गोष्टींचा अनुभव राहुल गांधी घेत होते. त्यामध्ये स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी त्यांना रस्त्यावर धावताना बघितलं, मुलांशी खेळताना बघितलं, विविध लोकांशी संवाद साधताना बघितलं.

एका गावात एका अतिशय सामान्य घरासमोर काही मुली आणि महिला खूप सारी फुलं घेऊन हार तयार करत बसले होते. रस्त्यावर देखील फुलांची उधळण करण्यात आली होती. मी त्यांना विचारलं की हे कोणी तुम्हाला करायला सांगितलं आहे का? तर त्या म्हणाल्या की घरी पाहुणा येत असेल तर आपण तयारी केली पाहिजे हे कोणी सांगावं लागेल का? ही तयारी आमची आम्ही आमच्या वतीने केली आहे. मग मी विचारलं की तुमच्या घरातून कोणी राजकारणात आहे का किंवा राजकीय पक्षाशी संबंधित आहे का? तर ते म्हणाले नाही. ते एक सर्वसामान्य काम करणारं कुटुंब होतं, ज्यांच्या घरची कुणीही व्यक्ती काँग्रेसचा भाग नव्हती किंवा राजकारणातही नव्हती.

मग मी त्यांना विचारलं की राहुल गांधी तुम्हाला भेटले तर तुमच्या काय अपेक्षा असतील? काय मागण्या असतील? तर तिथे जी मुलगी होती ती डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होती, ती म्हणाली की देशात नोकऱ्या तयार झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तिची आई म्हणाली की देशातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि भारत जोडो यात्रेत आपण बघितलं तर राहुल गांधींनी बेरोजगारी, महागाई या गोष्टींवर भर दिलेला आहे. आणि राहुल गांधींचं होणारं उत्स्फूर्त स्वागत (Welcome of Rahul Gandhi at various places) हे कदाचित त्यासाठी असेल की लोकांच्या मनातील भावना, त्यांचे प्रश्न त्यांनी तळमळीने या यात्रेत अगदी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मांडलेले आहेत.

राजकीय लोकांनी स्वागतासाठी बॅनर लावणं, फलक लावणं, तशी तयारी करून घेणं हे ठरवून केलेलं स्वागत असतं, ज्याच्यात बरीच कृत्रिमता जाणवत होती. अनेक राजकीय लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा स्वतःचे मोठे फ्लेक्स लावले होते. मात्र या सर्व गोष्टींपेक्षा स्थानिक लोकांनी स्वतःहून जी तयारी राहुल गांधींच्या स्वागतासाठी केली होती ती लक्षवेधी होती. एखादी व्यक्ती आपल्या मनातील भावना, आपले प्रश्न समजून घेते, पोट तिडकीने मांडते, त्यासाठी व्यवस्थेसमोर प्रश्न उभे करते. तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आपली वाटायला लागते. राहुल गांधींनी सुरुवातीपासून या यात्रेत मांडलेली भूमिका ही अनेक लोकांना कदाचित आपली वाटली असावी आणि म्हणून अधिकाधिक सहभाग हा सर्वसामान्य लोकांनी, स्थानिक जनतेने या यात्रेमध्ये घेतल्याचं चित्र पाहिलं. राहुल गांधींसोबत भेटलेल्या, बोललेल्या लोकांच्या सूचना याच्या नोंदी घेतल्या जात होत्या. एकंदरीत ज्या गोष्टी त्यांच्याशी बोलल्या जात आहेत त्याची गांभीर्याने दखल घेतली जात आहे हे, लोकांना कळत होतं. त्यामुळे या भेटण्या-बोलण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखी महत्त्वाचा होत जात होता.

बरं, राहुल गांधी हे केवळ जेष्ठ लोकांना किंवा विविध क्षेत्रातील जाणकार लोकांनाच भेटत होते असे नाही तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोक, छोटे व्यापारी, हातावर पोट असलेली व्यक्ती, शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेली मुलं, तरुण- तरुणी आणि त्याही पुढे जाऊन छोटी मुलं यांना भेटत होते आणि या प्रत्येकाशी तेवढ्याच आवडीने बोलत होते त्यामुळे केवळ एका विशिष्ट समाज घटकाला नव्हे तर सर्वांना आपलंसं करत राहुल गांधी पुढे चालत होते. राहुल गांधींच्या नेतृत्वात असलेल्या भारत जोडो यात्रेच्या प्रवासादरम्यान हा जनतेचा सहभाग खूप काही सांगून जातो.

  • प्रशांत वाघाये