टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 8 मे 2021 – कोरोनामुळे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन चेन्नई येथे ऑक्सिजनसंबंधी संशोधन करणाऱ्या एका संशोधकाचा ऑक्सिजन अभावी डॉ. भालचंद्र काकडे यांचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. काकडे 44 वर्षांचे होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तसेच कोरोना काळात ऑक्सिजन किती तुटवडा भासत आहे? याची प्रचिती देखील येत आहे.
शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रामध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर ते संशोधनाचे काम करत होते. ऑक्सिजन, हायड्रोजन वायूंपासून इंधनपूरक ऊर्जा निर्माण करून त्यावर रेल्वेही धावू लागेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले. यापाठोपाठ त्यांनी सात पेटंटही मिळविली. पण, ऑक्सिजनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका संशोधकाला अखेरच्या क्षणी ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 44 वर्षीय डॉ. भालचंद्र काकडे यांना कोरोनाने गाठलं.
डॉ. भालचंद्र काकडे हे चेन्नई येथे एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. तब्येत बिघडत गेल्यानं त्यांना ऑक्सिजनची गरज लागली. मात्र, शेवटपर्यंत त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी खूप धडपड केल्याचे सांगत आहेत. पण, सर्व व्यर्थ झालं. कमी वयात चांगली कामगिरी करणारा संशोधक गमावल्याने कोल्हापूरसह राज्यात हळहळ व्यक्त होतेय.
डॉ. भालचंद्र काकडे आणि त्यांच्या पत्नी देखील चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत होते. तेथील प्रयोगशाळेमध्ये काही जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर काकडे यांनीही संसर्ग झाल्यानंतर कोरोना चाचणी करून घेतली. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार सुरू झाले.
काही दिवसांत त्यांना श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यांच्या विद्यार्थ्यांनी शासकीय कोरोना केंद्रात त्यांना दाखल केलं. मात्र, तेथे त्यांना नीट उपचार मिळाले नाही, ऑक्सिजनची कमतरता भासली. ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकाला ऑक्सिजनअभावी तडफडावे लागले. ऑक्सिजनची पातळी खालावत गेल्याने काकडे यांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला.