TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 मे 2021 – एकीकडे इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई वाढली आहे. तर, जगात आलेल्या कोरोनामुळे देशातील विमान प्रवास देखील आता महाग होणार आहे. 1 जूनपासून विमान प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सरकारने डोमेस्टिक फ्लाइट्सच्या भाड्याची लोअर लिमिट 13 ते 16 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतलाय.

मार्च महिन्यात ही नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमान प्रवासाच्या भाड्याची किमान मर्यादा 5 टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारी महिन्यात लोअर प्राइस बँडमध्ये 10 टक्के तर हायर प्राइस बँडमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे 1 जून 2021 पासून विमान प्रवास महाग होणार आहे.

विमान प्रवास भाड्यात झालेली ही वाढ 1 जून 2021 पासून लागू होणार आहे. या दरम्यान प्रवासभाड्याची कमाल मर्यादा सध्या स्थिर ठेवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एअरलाइन कंपन्यांना मदत मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विमान उड्डाणांची संख्या पुन्हा कमी झाली.

नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार 40 मिनिटांच्या प्रवासासाठी किमान भाडं 2300 वरून 2600 केलं आहे. यात 13 टक्के वाढ केली आहे. याशिवाय 40 ते 60 मिनिटांच्या प्रवासासाठी किमान भाडं 2900 वरून वाढवून 3300 प्रति व्यक्ती केलं आहे.

देशात विमान प्रवासाला किती वेळ खर्ची होतो, त्यानुसार प्रवास भाड्याची कमाल आणि किमान मर्यादा निश्चित केली जाते. ही मर्यादा मागील वर्षी सुमारे दोन महिने चाललेल्या लॉकडाऊनंतर, जेव्हा 25 मे रोजी लॉकडाऊन उघडला होता, त्यावेळी निश्चित केली होती.

मागील वर्षी मेमध्ये डीजीसीएने देशांतर्गत उड्डाणांसाठी एकूण 7 फेअर बँडची घोषणा केलीय. हे 7 किंमत बँड प्रवासाच्या वेळेवर आधारित आहेत. पहिला बँड 40 मिनिटांपर्यंत प्रवास असणाऱ्या फ्लाइट्ससाठी आहे. तर उर्वरित बँड अनुक्रमे 40-60 मिनिटे, 60-90 मिनिटे, 90-120 मिनिटे, 120-150 मिनिटे, 150-180 मिनिटे आणि 180-210 मिनिटे असे आहेत.