TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे , दि. 29 मे 2021 – माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी छत्रपती यांच्यावर टीका केलीय. 102 वी घटना दुरुस्ती ज्यावेळी संसदेत केली गेली, त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते. मग, त्यांनी त्यावेळी तोंड का उघडले नाही?, असा थेट सवाल कोळसे-पाटील यांनी केलाय.

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत आहे. या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी आक्रमक पाऊल उचललं आहे. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा सवाल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. मराठा समाजाला आरक्षण देणे, हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात आहे, असे सांगताना ज्यावेळी संसदेत 102 वी घटना दुरुस्ती केली गेली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते, मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, याविषयावर ते का नाही बोलले? असा सवाल कोळसे-पाटील यांनी केलाय. यामुळे आता आणखी याला राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात केवळ राजकीय खेळी खेळली जातेय. ज्या मागण्या केल्याचे संभाजीराजे सांगत आहेत, त्यातून केवळ मराठ्यांच्या नावाने राजकारण केले जात आहे, असा आरोपही कोळसे-पाटील यांनी केलाय.