टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 30 मे 2021 – बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये (आयएमए) यांच्यातील वाद आणखी चिघळत आहे. अॅलोपॅथीविषयी बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानाविरोधात 1 जून रोजी देशव्यापी निषेध नोंदविणार आहे. तसेच 1 जून हा काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे. त्यामुळे याबाबत बाबा रामदेव यांनी ‘जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी’, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.
मागील रविवारी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका करत तिला ‘स्टुपिड’ (मूर्खपणा) आणि दिवाळखोर विज्ञान असे संबोधले. बाबा रामदेव यांनी 25 प्रश्नही अलोपॅथीला विचारले. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू आणि अन्य औषधे घेऊनही कोविड रुग्णांचे मृत्यू अलोपॅथीने रोखले नाही, असे आरोप त्यांनी केलेत. बाबा रामदेव यांच्या अशा टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून बाबा रामदेव यांनी आपली अलोपॅथीवरची टिप्पण्णी मागे घ्यावी, असे त्यांना सुनावले होते. तरीहि बाबा रामदेव यांनी डॉक्टरांवर पुन्हा टीका केली.
बाबा रामदेवविरोधात 1 हजार कोटींचा दावा :
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड राज्यातल्या शाखेने बाबा रामदेव यांच्याविरोधात अलोपॅथी आणि अलोपॅथी चिकित्सेवर अवमानकारक टीका केल्याप्रकरणी एक हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे उत्तराखंड शाखेचे सचिव अजय खन्ना यांनी 6 पानांची एक नोटीस बाबा रामदेव यांना पाठवली आहे. त्यात अलोपॅथीचे 2000 डॉक्टरांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या प्रतिमेवर रामदेव बाबा यांनी हल्ला केल्याचा आरोप केलाय.
या दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर निशाणा साधला.
अॅलोपॅथीच्या उपचारांवर वादग्रस्त भाष्य करणारे बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दिल्लीतील आयपी इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलीय.
बाबा रामदेव लसीकरणाबाबत लोकांची दिशाभूल करत असून त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी ‘आयएमए’कडून केली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, बाबा रामदेव कोरोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवीत आहे, हा एक गुन्हा आहे. आयएमएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.