TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 जून 2021 – योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आएमए यांच्यात सुरु झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. आता पुन्हा एकदा रामदेव बाबांनी घुमजाव करत कोरोना लस घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यासह बाबा रामदेव यांनी सर्वांना कोरोना लस घेण्याचे आवाहन देखील केलं आहे.

यावेळी रामदेव बाबा कोरोनापासून होणाऱ्या समस्या कमी करण्यास मदत करत आहेत, असे देखील सांगत आहेत. रामदेव बाबा आता कोरोना लस घेत आहेत म्हंटल्यावर त्यांचा कोरोनील औषधाचं काय? त्यांनी कोरोनील औषध नाकारलं आहे का? असे प्रश्न देखील यानिमित्त उपस्थित होत आहेत.

या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे, अशी घोषणा केलीय. त्यानंतर रामदेव बाबा यांनी लस घेण्याचे आवाहन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रामदेव यांचा एका व्हायरल व्हिडिओत करोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. करोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

त्यांच्या या विधानामुळे करोना काळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आता रामदेव बाबांनी माघार घेत कोरोना लस घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्या इतर अ‍ॅलोपॅथीसह केलेल्या व्यक्तव्यावर लोकांनी किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.