TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जून 2021 – लसीकरण करून कोरोना नियंत्रित करण्यावर देशात भर दिला जात आहे. त्यासाठी देशात 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण 1 मे पासून सुरू केले. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे यात सातत्याने खंड पडला. केंद्र सरकारने जूनअखेर पासून महाराष्ट्राला लसीचे दररोज नऊ लाख डोस देणार आहे, असे सांगितले आहे.

कोव्हीशील्ड, कोव्हाक्सिन या लसीचे उत्पादन वाढल्यानंतर आणि स्फुटनिक व्ही उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकार हा पुरवठा करणार आहे. याबाबतची माहिती राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलीय.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला जून महिन्यात 70 लाख तर जुलै महिन्यात एक कोटी लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहे. या दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात दररोज 2.13 लाख लसी दिल्या आहेत. हेच प्रमाण एप्रिल महिन्यात दररोज 3.25 लाख इतके होते.

केंद्र सरकारने दररोज नऊ लाख लस देण्याची तयारी दर्शवल्यानंतर महाराष्ट्राने हि नागरिकांना इतक्या लसी दररोज देण्यासाठी सज्ज आहे, असे म्हटलंय. तसेच राज्यात दररोज लसीचे 15 लाख डोस दिले जातील, असंही केंद्राला कळवलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

तत्पूर्वी मे महिन्यात केंद्र सरकारने राज्याला लसचे 40.06 लाख डोस दिले होते. राज्याने या कालावधीत 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी 25.1 लाख अतिरिक्त लसी खरेदी केल्या. मात्र, लसींचा तुटवडा भासू लागल्याने 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसी 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वापरल्या. तर राज्यात मे महिन्यात खासगी क्षेत्राकडून 32.38 लाख लसी खरेदी केल्या होत्या.