नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government) ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत विविध राज्यांमध्ये विरोध होत (Agnipath Scheme Violence) आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा बिहारमध्ये दिसून येत आहे. सैन्य भरतीची तयारी करणारे तरुण रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. बस – गाड्या फोडल्या जात आहेत, रस्ते जाम केले जात आहेत. पोलिस-प्रशासनाशी संबंधित लोकांवरही दगडफेक केली जात आहे.
त्यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयानं (Union Home Ministry) एक महत्वाचा निर्णय घेतलाय. अग्निपथ योजनेअंतर्गत सेवेत 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी (Agniveers) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील (Assam Rifles) भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं (HMO India) घेतला आहे.
अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा 3 वर्ष वयाची सूट दिली जाईल तसेच अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढं 5 वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल, असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं लष्करभरतीसाठी (Indian Army) नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नव्यानं भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नाही आणि याची दखल घेत सरकारनं 2022 साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयामध्ये यावर्षी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2022 अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा 21 वर्षे ऐवजी 23 वर्षे अशी करण्यात आलीय.