TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 30 मे 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ 200 कोटी लसींची ऑर्डर देणे गरजेचे आहे. जेणेकरून लस कमी दरात उपलब्ध होईल. हे अगोदर केले असते तर कमी किंमतीमध्ये लस मिळाली असती. केंद्राचे लसीकरणाचे धोरण चुकलं आहे. राज्यांपासून शहरांपर्यंत वेगवेगळ्या ऑर्डर दिल्या जाताहेत. लसीकरणाच्या एकूण नियोजनात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे,

नरेंद्र मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, रोहित टिळक, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र शनगेकर, लता राजगुरू आदी उपस्थित होते.

पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेली बालाकोट येथील कारवाईमधील शहिदांच्या नावे मते मागून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद, समता बंधुता ऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष पोसलाय. लोकशाहीचा गळा घोटला असून कोरोना काळात नियोजनशून्य कारभार, अहंकार आणि आत्ममग्नता यामुळे देशाची अवस्था वाईट झालीय.

कलम ३७० पारित करून घेतल्यानंतर दंडुकेशाहीच्या जोरावर काश्मीरमधील उठाव दडपला आहे. नेत्यांना तुरुंगात डांबून घटनेने दिलेला भाषण व विचार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दडपला आहे. धर्मावर आधारित राजकारण करीत नागरिकत्वाचा कायदा रेटून पारित केला आहे. हिंदुत्वाचा अजेंडा असलेल्या या कायद्याविरुद्ध देशभरात झालेली आंदोलने चिरडली आहे, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

नोटबंदीचा निर्णय आणि जीएसटीची ढिसाळ अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागलीय. त्यामुळे कोरोनापूर्वी २०१९-२० च्या शेवटच्या तिमाहिमध्ये आर्थिक विकास दर हा नीचांकी ४.२ टक्के होता.

कोरोना काळात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर उणे २४ टक्क्यापर्यंत घसरला आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली गेले आहे, अशी टीकाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली आहे.