TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 मे 2021 – अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने बाबा रामदेव अडचणीत सापडले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए उत्तराखंडने बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविलीय. यात बाबा रामदेवांना पुढील 15 दिवसांत त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणारा व्हिडिओ जारी करून लेखी माफी मागावी, असे सांगितले आहे.

या नोटिसमध्ये म्हंटले आहे की, बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी नाही मागितली, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी करण्यात येईल. यासह रामदेव यांना 72 तासांच्या आत कोरोनिल किटची दिशाभूल करणारी जाहिरात देखील सर्व ठिकाणांहून हटवावी लागेल. कोरोनिल कोविड व्हॅक्सीननंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्सवर प्रभावी आहे, असा दावा या जाहिरातीत केला आहे.

बाबा रामदेवांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य :
काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव एका कार्यक्रमात म्हणाले होते, अ‍ॅलोपॅथी ओषधं घेतल्याने लाखो लोकांचा मृत्यू झालाय. अ‍ॅलोपॅथी स्टुपीड आणि दिवाळखोर सायन्स आहे. त्यांच्या या वक्तव्यांवरून वाद वाढल्यानंतर व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या भूमिकेनंतर रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते.

बाबा रामदेवांनी विचारले होते प्रश्न :
बाबा रामदेव यांनी एक पत्र काढून हेपटाइटिस, लिव्हर सोयरायसिस, हार्ट एनलार्जमेंट, शुगर लेवल 1 व 2, फॅटी लिव्हर, थायरॉइड, ब्लॉकेज, बायपास, मायग्रेन, पायरिया, निद्रानाश, स्ट्रेस, ड्रग्स अ‍ॅडिक्शन आदींवरील कायम उपचारांबद्दल प्रश्न विचारले आहेत.

तर अमेरिकेचे डॉक्टर म्हणतात, डब्ल्यूएचओ म्हणते, तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही? आयुर्वेदावर टीका का केली जाते?, शिव्या का दिल्या जातात? फार्मा कंपन्या जास्त आहेत. मग, डॉक्टर त्यांचे बळी का ठरत आहेत?. डॉक्टर तर फार्मा कंपनीचा प्रतिनिधी नसतो, असेही बाबा रामदेव म्हणाले होते.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, …
“कोरोनावरील उपचारांत ॲलोपॅथी औषधाला तमाशा, निरुपयोगी व दिवाळखोर ठरवणे अतिशय दुर्दैवी आहे. आज लाखो लोक ॲलोपॅथीमुळे कोरोनावर मात करून घरी परतलेत. आज देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.13 टक्के आणि बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के आहे.

यामागे ॲलोपॅथी आणि डॉक्टरांचे मोठे योगदान आहे. उपचारांच्या सध्याच्या प्रक्रियेला तमाशा संबोधने ॲलोपथी उपचारांची नव्हे, तर डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचविण्यासारखे आहे. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर मी नाराज आहे,” असे डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे.