TOD Marathi

टिओडी मराठी, बेंगळुरू, दि. 26 मे 2021 – देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना 5 राज्यांतील विधानसभा आणि काही ठिकाणी पोटनिवडणुका घेतल्या. यावेळी आयोजित केलेल्या रॅली आणि सभांमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नाही, हे दिसतंय. यावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने बेळगाव पोलिसांना धारेवर धरले. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात FIR का नोंदवला नाही, अशी विचारणा पोलिसांना केलीय.

बेळगावमध्ये १७ जानेवारी रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत अधिक संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केलेले आढळून आले नाही.

याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी कर्नाटक उच्च न्यायालयाने पोलिसांना खडसावले. भाजपच्या निवडणूक रॅलीत सहभागी झालेले तसेच अमित शहांविरोधात FIR का नोंदवला नाही?, असा थेट सवाल कर्नाटक उच्च न्यायालयाने केला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय ओक आणि न्या. सूरज गोविंदराज यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना न्यायालयाने चांगलेच फटकारले. पोलीस आयुक्तांनी न्यायालयात सादर केलेले निवेदन हे निष्काळजीपणा दर्शवत आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

कर्नाटक महामारी कायदा २०२० बाबत पोलीस आयुक्त अनभिज्ञ आहे, असे यावरून स्पष्ट दिसतंय. तसेच राज्य सरकारकडून जारी केलेल्या आदेशांविषयीही पोलीस आयुक्तांना माहिती नाही, असे दिसून येत आहे, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले आहे.

बेळगावातील रॅलीचे फोटो पाहिले, तर कोणीही मास्क घातलेला नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही. लोकांची गर्दी जमली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. मात्र, तरीही पोलीस आयुक्तांनी याविरोधात का कारवाई केली नाही?, पोलीस आयुक्त फक्त २० हजार रुपये ठोठावलेल्या दंडावर समाधानी आहेत का, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले.

या दरम्यान, यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या एका आदेशानुसार, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून आयोजित केलेल्या कार्यक्रमांसंदर्भात कारवाई करावी. तसेच फक्त आयोजक नाही, तर सहभागी व्यक्तींविरोधात योग्य करवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले होते.