अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकू हल्ला!; निगडी पोलिसांत तक्रार दाखल

टिओडी मराठी, पुणे, दि. 26 मे 2021 – निगडी येथील घरात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना काल घडली आहे. यात सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी जखमी झालेत. हल्लेखोर हा सोनालीचा चाहता आहे, असे समजते. याप्रकरणी निगडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अजय विष्णू शेटे (वय 24, रा. बीड) असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेटे सकाळी 7 च्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. त्याने चाकूने हल्ला केला.

यावेळी सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. झालेल्या झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी जखमी झालेत. तपासादरम्यान आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळले. चोरीच्या उद्देशाने त्याने हल्ला केल्याची तक्रार कुलकर्णी यांनी पोलिसांत दिलीय.

कुलकर्णीच्या इमारतीतील शेजाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन आहे, असे सांगितले. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

Please follow and like us: