TOD Marathi

लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन; सरपंच ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपर्यंतचा त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

टिओडी मराठी, दि. 26 मे 2021 –  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांची आज जयंती. केवळ काँग्रेस पक्ष नव्हे तर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षाचे विविध नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक विलासराव देशमुख यांना अभिवादन करतात. विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये विलासराव यांनी अनेक पदं भूषवली आहेत. खास करुन एक ग्रामपंचायत सरपंच ते मुख्यमंत्री आणि पुढे केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री हा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा असाच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासात त्यांचे अनमोल योगदान आहे. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा ‘टिओडी मराठी’च्या वतीने एक थोडक्यात माहितीपर लेख.

विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर जिल्ह्यातील बाभुळगाव इथे झाला. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंचे शिक्षण घेतले. त्यांनी कला आणि विज्ञान अशा दोन्ही शाखेतून शिक्षण घेतले. पुण्यातील इंडियन लॉ सोसाइटी लॉ कॉलेज येथून त्यांनी कायद्याचे देखील शिक्षण घेतले. विलासराव देशमुख यांना सुरुवातीपासून राजकारण, समाजकारणाची आवड होती. त्यामुळे ते विद्यार्थीदशेतून चळवळीत सहभागी होत असे.

राजकारणामध्ये सक्रीय झाल्यापासून विलासराव देशमुख आणि महाराष्ट्रातील विविध औद्योगिक घराण्यांशी सौगार्दपूर्ण संबंध राहिले. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर विलासराव देशमुख यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी पडली आणि त्यांनी ती यशस्वी पार पाडली.

विलासराव यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकता बाभुळगाव ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते. ते पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले आहेत. त्यानंतर पुढे ते आमदार झाले आणि त्यांनी मगे वळून पाहिले नाही. पुढे ते राज्यात मुख्यमंत्री झाले अन केंद्रात मंत्रीही. विलासरावांनी काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक कामही चांगले केले. ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेत. त्यांनी आपल्या नेतृत्वाच्या काळामध्ये पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न केले.

विलासराव देशमुख यांचा यशाचा आलेख वाढत राहिला. त्यांना काही वेळा पराभवही सहन करावा लागला. 1995 मध्ये विलासराव देशमुख यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 1999 मध्ये पुन्हा त्यांचे आमदार म्हणून पुनरागमन झाले. तेव्हा ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, काही काळात त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. पुढील काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाले. पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा संधी दिली. 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवरी 2003 या कळात विलासराव मुख्यमंत्री झाले आणि 7 सप्टेंबर 2004 ते 5 डिसेंबर 2008 या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.

या दरम्यान, मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. विलासराव देशमुख यांनी उद्योग, संसदीय कामकाज, ग्रामीण विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या अनेक खात्यांवर मंत्री म्हणून काम केले आहे. विलासराव देशमुख मुंबई क्रिकेट एशोसिएशनचे अध्यक्ष होते.

महाराष्ट्राच्या इतिहातात दोन वेळा यशस्वी मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी केलेल्या कामाची नोंद आहे. याच कामाची आणि नेतृत्वाची पावती म्हणून पुढे दिल्लीत गेले आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री झाले. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या दिल्लीत त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

माणूस कितीही मोठा झाला तरी त्यांची आपल्या जमीनीची नाळ कायम असली पाहिजे, हे विलासराव देशमुख यांनी दाखवून दिलं. देशमुख यांनी देशाच्या राजकारणात सर्वोच्च पातळी गाठली, तरी कधी आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे ‘जे जे नवं ते ते माझ्या लातूरला आणि मराठावाड्याला हवंय’ याच शब्दावर ठाम राहून त्यांनी लातूरला विकासाच्या दृष्टीने सक्षम केलं.

मराठवाड्याचे लातूरचं भूषण, उत्कृष्ट भाषणशैली, हजरजबाबी, संयमी, कृतीशील नेता, स्वच्छ राजकारणी, विकासरत्न, लातूररत्न,महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय स्व.विलासराव देशमुख यांना जयंती निम्मित विनम्र अभिवादन.!