TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 ऑगस्ट 2021 – सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देताहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे.

मी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की, त्यांनी मला दिल्लीमध्ये मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली, असे ते म्हणाले.

सूक्ष्म आणि लघु-मध्यम उद्योग मंत्र्यालय नारायण यांच्याकडे आहे. दुसरीकडे नारायण राणे यांनी राज्यामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. तर गोमूत्र शिंपडण्यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

राज्यात वीज पुरवठा नाही, म्हणून ३५० कंपन्या बंद आहेत. मी प्रयत्न करणार आहे, इथल्या मंत्र्यांशीही बोलणार आहे. ३५० कंपन्या बंद असल्याने ३ लाख कामगार आज बेरोजगार झालेत.

गोमूत्र शिंपडणाऱ्यांना हे माहिती नाही. ते शिंपडत राहण्यापेक्षा रोजगार द्यावेत. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावेत.

तसेच राज्यातील युवकांना रोजगार द्यावा. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून द्यावी. देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा, अशी टीका नारायण राणे यांनी केलीय.

… म्हणून केले शुद्धिकरण
शिवसेना सोडल्यानंतर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नारायण राणे यांना कधी स्मृतीस्थळाची आठवण आली नव्हती. आता राजकारणासाठी त्यांना बाळासाहेबांची आठवण झालीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत असताना बाळासाहेबांच्या या पुत्रावर चुकीच्या पद्धतीने टीका करणाऱ्या नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले आहे.

त्यामुळे दुग्धाभिषेक करून, फुले वाहून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केल्याचे अप्पा पाटील आणि इतर ज्येष्ठ शिवसैनिकांनी पत्रकारांना सांगितले आहे.