TOD Marathi

टिओडी मराठी, बारामती, दि. 21 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात बैलगाडा शर्यत सुरू व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. पण, काही लोक शर्यतीवरून स्टंट करत आहेत. स्टंट करणाऱ्यांचे केंद्रात सरकार आहे. त्यांना कोण अडविले होते?, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना हाणला आहे..

अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शर्यतीला परवानगी देता येत नाही. सरकारपेक्षा कोर्टाच्या निर्णयाला अधिक महत्व आहे. बैल हा पाळीव प्राणी म्हणून न गणता वन्यप्राणी म्हणून गणला आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात. हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला प्रश्‍न आहे. संसदेत अनेकदा हा प्रश्‍न उपस्थित केलाय.

सध्या काहीजण स्टंटबाजी करीत आहेत, जे स्टंट करतात त्यांचे गेल्या पाच वर्षांत सरकार होतं. त्यांना कोणीही अडवलं नव्हतं?. आताही केंद्रात त्यांचे सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरुय. आम्ही लोकांचे भलं करत आहे, असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.

वास्तविक कोणत्याही पक्षाची किंवा पक्षविरहीत व्यक्‍ती असेल आणि त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि गुन्हे दाखल होतील. अशा प्रकारे कोणतेही कृत्य चालणार नाही.

लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी त्याचे पालन केले आहे. कारण, ते सर्वांच्या हिताचे होते. मात्र आम्ही नियम करायचे आणि आम्ही स्पर्धा घेऊन नियम मोडायचे, हे आमच्या रक्‍तात नाही, असा टोला पवार यांनी विरोधकांना हाणला आहे.