TOD Marathi

मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad left Congress) यांनी शुक्रवारी कॉंग्रेस पक्षासोबतचं सुमारे ५० वर्षांचं नातं तोडलं. पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत आझाद यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांना लिहिलेल्या पाच पानांच्या पत्रात काँग्रेसच्या राजकीय अधःपतनासाठी राहुल गांधी यांना जबाबदार ठरवून त्यांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. आझाद यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसमधून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM of Maharashtra Prithviraj Chavan) यांनी आझाद यांनी पक्ष सोडण्यामागे काँग्रेस नेतृत्वाला दोष देत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

‘गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा ही दुर्दैवी गोष्ट आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, अशी मागणी माझ्यासह पक्षातील इतर नेत्यांनी केली होती. पक्ष बळकट होण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. यातून पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रश्नच नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपविरुद्ध लढायचं असेल तर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, असं आमचं म्हणणं होतं. त्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात यावी, असं आम्ही म्हणालो. कारण मागील २४ वर्षांत काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुकाच झालेल्या नाहीत,’ अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी नेतृत्वावर टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्ष व्हावी, अशी सर्वांची मागणी होती. मात्र केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.