TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 मे 2021 – मुंबईच्या एका गँगस्टरनं सोशल मीडियावर लाखो रुपयांसह एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यानंतर चर्चांना उधाण आलंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली असून या गँगस्टरला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये पोलिसांनी गँगस्टरला लाखो रुपये कसे आले?, याबाबतची माहिती मागितली आहे. मुंबईच्या डोंगरी भागात राहाणाऱ्या गुंडाचे नाव शम्स सय्यद असे आहे.

सध्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत या व्यक्तीच्या चारही बाजूला पाचशे व 2000 रुपयांच्या नोटांच्या गाड्या आहेत. एवढेच नव्हे तर या लहान मुलाच्या हातातही पैशाच्या गाड्या आहेत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर नेटकरी देखील हैराण झाले आहेत की इतका पैसा कसा आणि कुठून आलाय?.

मुंबई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या व्हिडिओत मुंबईतील शम्स सय्यद नावाच्या एका गुंड दिसत आहे. शम्स सय्यदविरोधात मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलंय.

मुंबई पोलीस डीसीपी एन चैतन्य यांनी सांगितले, या व्हिडिओबाबत आम्ही त्या व्यक्तीला नोटीस पाठवलीय. व्हिडिओत दिसत असलेल्या व्यक्तीला उत्तर मागितलं आहे. त्याच्याकडे इतके पैसे कसे आले? त्यांनी सांगितलं की, शम्स सय्यदविरोधात संपूर्ण मुंबईत दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील एक प्रकरण हत्येचा प्रयत्न केला आहे.