TOD Marathi

टिओडी मराठी, चंदीगड, दि. 19 जून 2021 – कोरोनामुळे भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री 11.30च्या सुमारास रुग्णालयात निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. एक महिन्यापासून त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्याविरुद्ध त्यांचा लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी तथा भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांचेही कोरोनामुळे पाच दिवसांपूर्वी निधन झाले होते.

पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग आणि तीन मुली असा परिवार आहे.

शुक्रवारी संध्याकाळपासून त्यांची प्रकृती खालावली. ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर मिल्खा यांची कोरोना चाचणी बुधवारी निगेटिव्ह आली होती.

मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. १९५९ साली मिल्खा सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले होते.