TOD Marathi

अलविदा Milkha Singh ; भारताचे माजी दिग्गज धावपटूची प्रेरणादायी Life Journey

टिओडी मराठी, चंदीगड, दि. 19 जून 2021 – भारतीय क्रीडा जगतात अवर्जूनपणे मिल्खा सिंग यांचं नाव सर्वात अव्वल स्थानी घेतलं जातं. कारण ते देशाचे पहिले ट्रॅक अँड फील्ड सुपरस्टार खेळाडू होते. मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री चंदीगड येथे निधन झालं. मिल्खा सिंग १९६० साली रोम ऑलिम्पिक स्पर्धेत एका सेकंदाचा १०० व्या वाटा अशा किंचितशा फरकाने ऑलिम्पिक पदकाला मुकले होते, हाच त्यांच्या करिअरमधील सर्वात महत्वाचा क्षण.

२०० मी व ४०० मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम :
मिल्खा सिंग हे १९५६ साली मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये रांगडा खेळाडू म्हणून उतरले होते. त्यावर्षी त्यांची कामगिरी खास राहिली नाही. पण, पुढील काही वर्षामध्ये मिल्खा सिंग यांनी मेहनत घेतली. मिल्खा सिंग यांनी राष्ट्रीय विक्रमाची नोंद केलीय.

२०० मीर व ४०० मीटरच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मिल्खा सिंग यांच्या नावावर जमा झाला. केवळ रोम ऑलिम्पिक पुरतेच मिल्खा सिंग मर्यादित नव्हते. भारतीय ट्रॅक अँड फिल्डमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे.

आशियाई स्पर्धेत उत्तम कामगिरी :
मिल्खा सिंग यांची खेळाप्रती समर्पित भावना आणि जिंकण्याची जिद्द अतिशय कमालीची होती. १९५८ साली टोकियो आशियाई स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकाविले. मेलबर्न ऑलिम्पिकच्या फायनल इव्हेंटमध्ये ते पात्र ठरू शकले नव्हते. पण, त्यामुळे ते खचले नाहीत.

अपयशावर मात करण्यासाठी स्वत:मध्ये कसे बदल करत होते. त्यांनी अमेरिकेचे चार्ल्स जेनकिंस यांच्यासोबतही चर्चा केली. जेनकिंस हे ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिले प्रकारातील सुवर्ण पदक विजेते खेळाडू होते. जेनकिंस नेमका कसा सराव करतात?, त्यांचा दिवस नेमका कसा असतो? आदी माहिती त्यांनी जाणून घेत होते. जेनकिंस यांनीही मिल्खा सिंग यांची मदत केली.

आशियाई स्पर्धेत नोंदवला विक्रम :
मिल्खा सिंग हे २७ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी पुढची दोन वर्ष जेनकिंस यांना फॉलो केलं. त्यामुळे मिल्खा सिंग यांनी १९५८ साली आशियाई स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मिल्खा सिंग यांना ४०० मीटर शर्यतीत रस होता. त्यांनी ४७ सेकंदात अंतर पूर्ण करुन सुवर्ण पदक पटकाविले.

तर शर्यत पूर्णकरण्यासाठी रौप्य पदक विजेत्या पाब्लो सोमब्लिंगो यांच्यापेक्षा दोन सेकंद कमी वेळ मिल्खा सिंग यांना लागला होता.

‘तो’ रेकोर्ड कुणी मोडला नाही :
मिल्खा सिंग यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदाकाची कमाई करणारे पहिले भारतीय होते. त्यांचा हा विक्रम ५२ वर्ष कामय होता. त्यानंतर २०१० साली डिस्कस थ्रोअर कृष्णा पुनिया यानं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकाविले. त्यानंतर विकास गौडा यांने २०१४ साली सुवर्ण पदक जिंकलं. पण, मिल्खा सिंग यांचं सुवर्णपदक देशासाठी खास ठरलं होतं. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी एक दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहिर केली होती.

पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरविले :
मिल्खा सिंग यांनी जिंकलेलं दुसरं सुवर्ण पदक खास ठरलं. २०० मीटर प्रकारात भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या अब्दुल खालिद याला मिल्खा सिंग यांनी पराभूत केलं. खालिदवर मात करणं सोपं नव्हतं. कारण तोही १०० मीटर प्रकारात विक्रमवीर खेळाडू होता. त्यावेळी मिल्खा सिंग जबरदस्त फॉर्मात होते.

मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिद याला नमवून २१.६ सेकंदात स्पर्धा जिंकून सुवर्ण पदक पटकाविले. फक्त सुवर्ण पदकच जिंकलं नाही, तर नव्या विक्रमाची नोंद मिल्खा सिंग यांनी केली. पण, फिनिशिंग लाइन जवळ जेव्हा ते पोहोचले तेव्हा मांडीचे स्नायू ताणल्यानं ते जागेवर कोसळले.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये असा रचला इतिहास :
आशियाई स्पर्धेत २ सुवर्णपदकांची कमाई केल्यानंतर मिल्खा सिंग यांचा प्रवास थांबला नाही. कारण, वेळ होती कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची ओळख निर्माण करुन देण्याची.

भारतीय अॅथलेटिक्स विश्वात मिल्खा सिंग यांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला मिल्खा सिंग यांचा अभिमान वाटत होता. यावेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये जगातील खेळाडूंसमोर मिल्खा सिंग यांना स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याची वेळ होती.

कॉमनवेल्थ गेम्समध्येही ४०० मीटर प्रकारात मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक पटकाविले होते. पण, या स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरेन असा विश्वास खुद्द मिल्खा सिंग यांनाही नव्हता. त्यांनी स्वत: ते बोलून दाखवलं होतं. “कॉमनवेल्थ गेम्समध्ये मी सुवर्णपदक जिंकेन, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. कारण मी विश्वविक्रमी मेलकम स्पेन्ससोबत धावत होतो. ते ४०० मीटर प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू होते”.

असा रचला नवा राष्ट्रीय विक्रम :

मिल्खा सिंग यांनी जोरदार तयारी केली होती. त्यांचे अमेरिकी प्रशिक्षक डॉ. आर्थर हावर्ड यांनी स्पेन्स याची गेम ओळखला होता. स्पेन्स शर्यतीत सुरुवातीच्या टप्प्यात हातचं राखून धावायचा आणि अखेरच्या वेळी वेग घ्यायचा.

याचाच फायदा मिल्खा सिंग यांनी घेतला. त्यांनी आपण शर्यतीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते अखेरच्या टप्प्यापर्यंत वेग कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यायची, असं पक्कं केलं होतं. मिल्खा सिंग यांची चाल यशस्वी झाली आणि ४४० यार्डाच्या शर्यतीत मिल्खा सिंग अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आघाडीवर राहिले. ४६.६ सेकंदात शर्यत पूर्ण करुन त्यांनी नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.