TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 जून 2021 – खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलंय. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसलाय. इतकंच नव्हे तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.

हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आणि खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे, असे समजते.

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय.

नवनीत राणा यांना हायकोर्टाने 2 लाखांचा दंड ही सुनावला आहे. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. या दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आता नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.

नवनीत राणा राजकारणात कशा आल्या?
नवनीत यांचे लग्न झाले तेव्हा रवी राणा हे अमरावतीच्या बाडनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2014 साली नवनीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. यात त्यांनी चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेले.

शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले. मात्र, या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या.

नवनीत राणा यांचा परिचय :
नवनीत राणा यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत झाला असून त्यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नवनीत राणा या मॉडेलिंग करत होत्या. मात्र, 2011 साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली.

राणा यांचा विवाह सोहळाही चर्चेचा विषय ठरला होता. 3100 जोडप्यांसह त्यांनी सामूहिक विवाहसोहळ्यात नवनीत राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली. या विवाहसोहळ्याला राजकीय,सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.