TOD Marathi

टिओडी मराठी, चंदीगड, दि. 19 जून 2021 – भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंह यांच्या निधनानंतर पंजाब सरकारने एक दिवस राज्य शोक जाहीर केलाय. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

‘फ्लाइंग शीख’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना गुरुवारी कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ट्विटद्वारे अमरिंदरसिंग यांनी मिल्खा सिंग यांच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, मिल्खा सिंग जी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले. हा एका युगाचा शेवट आहे.

संपूर्ण देश आणि पंजाबचे हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुबियांबद्दल आणि त्यांच्या लाखो चाहत्यांविषयी माझ्या सहवेदना आहेत. येणाऱ्या कित्येक पिढ्यांपर्यंत फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचे नाव जगभर लक्षात राहील.

नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्वीट केले की, “आज श्री मिल्खासिंग जी यांचे निधन झाल्यामुळे आम्ही एक महान खेळाडू गमावलाय. त्यांनी आपल्या खेळाने देशाच्या स्वप्नांना नवे उड्डाण दिले.

मिल्खा सिंग यांना भारतीय लोकांच्या हृदयात स्थान आहे. त्यांनी आपल्या प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाने कोट्यावधी लोकांच्या जीवनावर परिणाम केलाय. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे.

मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे याच आठवड्यामध्ये वयाच्या 85 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर ५ दिवसात मिल्खा यांनीही जगाचा निरोप घेतला.