TOD Marathi

माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या नागपूरच्या घरी ED चा छापा ; CRPF पथक तैनात, देशमुख यांच्या अडचणी वाढणार

टिओडी मराठी, नागपूर, दि. 25 जून 2021 – महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजत आहे.

अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये नसून ते मुंबईत आहेत, असं समजत आहे. देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसेच त्यांच्या निकटवर्ती नातेवाईक यांच्या घरी छापे टाकले आहेत.

ईडीचे 5 अधिकारी देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरुय. सकाळी 7 वाजल्यापासून ईडीने हि कारवाई सुरु केलीय. 16 जून रोजी ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी देखील छापे टाकले होते.

देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. त्यांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या तुकड्याही तैनात झाल्या आहेत. या छापेमारीवेळी ईडीसोबत पॅरामिलिटरी दलाचे कर्मचारी दाखल झालेत. यात महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. सध्या नागपुराच्या घरात देशमुखांचा मुलगा सलील देशमुख, सून आणि पत्नी घरी आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणामध्ये अनिल देशमुख यांना 5 एप्रिल रोजी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून 11 तास चौकशी केली होती.