TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 25 जून 2021 – चार महिन्यांत ओबीसी आरक्षण देतो, असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मंत्री छगन भुजबळ यांनी टोला हाणला आहे. जेव्हा हातात सरकार होतं, तेव्हा का केलं नाही?, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस यांना केला आहे.

ओबीसी आरक्षण मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण मुद्यावरून त्यांनी मोर्चा आता ओबीसी आरक्षण मुद्याकडे वळविला आहे, हे सर्वांना समजत आहे.

5 वर्षे भाजप सरकारच्या हातात ओबीसी विषय होता. मात्र, त्यांनी काहीही केलं नाही. भाजप सरकारने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्र सरकारने माहिती दिली नाही आणि आता म्हणताहेत, चार महिन्यांत करतो, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.

ओबीसी आरक्षणावर पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाचे संपूर्ण श्रेय घ्यावे. पण, ओबीसी आरक्षणाची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, ही माझी विनंती आहे.

आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आज, उद्या, कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी आरक्षणाच्या माहितीसंदर्भात भेटायला जायला तयार आहोत.

मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, तुम्ही नेतृत्व करा, तुमच्या नेतृत्वात आम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटायला येतो. पण, तुम्ही आंदोलन करत आहात, मी स्वागत करतो.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला. त्यानंतर तो मंजूरही केला. यावर छगन भुजबळ म्हणाले, भाजपच्या बैठकीत अजित पवार यांच्या चौकशीसंदर्भातला ठराव पास केला आहे.

मात्र, त्याच भाजपने अजित पवार यांच्या सोबत सरकार स्थापन केलं होतं. आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीशी ही ईडी लावली होती. मात्र, आमच्या पक्षाचे कोणतेही नुकसान झालेले नाही.