TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जून 2021 – पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोकसीला डोमिनिका उच्च न्यायालयाने दणका दिलाय. शुक्रवारी डोमिनिका उच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिलाय. एका वृत्तसंस्था एएनआयनुसार, चोकसी पळून जाण्याचा धोका असल्याने डोमिनिका उच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे.

मेहुल चोकसीचा वकिलांचा युक्तिवाद :
याअगोदर मेहुल चोकसीच्या वकिलांनी डोमिनिका उच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, कॅरिकॉम नागरिक म्हणून मेहुल चोकसीला जामीन मिळाला पाहिजे.

यावेळी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मेहुल चोकसीची प्रकृती ठीक नाही. अशा परिस्थितीमध्ये सिक्युरिटी डिपॉझिट घेतल्यानंतर त्याला जामीन मिळायला हवा.

त्याचवेळी सरकारी पक्षाने जामिनाचा विरोध करत म्हटले की, मेहुल चोकसी फ्लाइट रिस्कवर आहे व इंटरपोलने त्याच्याविरुद्ध नोटीस जारी केली आहे. त्याला जामीन मिळाल्यास तो पळून जाण्याचा धोका कायम राहील. त्यामुळे त्याला जामीन मंजूर होऊ नये.

याअगोदर झालेल्या सुनावणीमध्ये डोमिनिका उच्च न्यायालयाने मेहुल चोकसीच्या जामीन अर्जावरील सुनावणी 11 जूनपर्यंत तहकूब केली होती. न्यायालयामध्ये जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मेहुल चोकसीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

असे आहे संपूर्ण प्रकरण :
चोकसी अँटिगा-बार्बुडा येथे राहत होता. परंतु 23 मे रोजी तो अचानक बेपत्ता झाला व दोन दिवसांनंतर डोमिनिकामध्ये तो पकडला गेला. मेहुल चोकसीचा असा दावा आहे, तो त्याची मैत्रीण बार्बरा जाबेरिकासोबत होता.

त्या काळामध्ये त्याचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्याला मारहाणही केली. पण, या संपूर्ण घटनेदरम्यान जबरिकाने त्याला काहीच मदत केली नाही. यावरून हे स्पष्ट होते की, ती अपहरण रचण्यात सहभागी होती.