TOD Marathi

टिओडी मराठी, नांदेड, दि. 27 जून 2021 – सत्ता मिळाल्यास ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न त्वरित सोडवतो, अशी ग्वाही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिहल्ला करत देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला आहे.

याबाबत जयंत पाटील यांनी असे म्हटले आहे की, ओबीसींचे प्रश्‍न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना सत्तेवर येण्याची गरज काय आहे?. त्यांनी ओबीसींचा विषय कशा मार्गाने सोडवता येईल?, याची माहिती आम्हाला द्यावी.

आम्ही त्यानुसार तो प्रश्‍न सोडवू. त्यासाठी फडणवीसांना सत्तेवर येण्याची गरज नाही. सत्ता मिळाल्याशिवाय कोणाच्या हिताचे काम करणार नाही, ही भूमिका बरोबर नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सत्ता मिळेपर्यंत ओबीसींच्या हिताचे काम करणार नाही, अशी भूमिका एखाद्या लोकप्रतिनिधींनी घेणे योग्य नाही. त्यांना ओबीसींचा इतका कळवळा आहे, तर त्यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात खितपत का ठेवले होते?, असा सवालही त्यांनी केला. भाजपमधील ओबीसींचे नेतृत्व संपवण्याचे काम या नेत्याने केले होते, असा दावाही पाटील यांनी केला.