TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 जुलै 2021 – बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामध्ये नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी आमदार आणि खासदार झाल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे. परंतु आमदार बनलेले पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे हे नगरसेवक पालिकेचे मानधन सुद्धा घेत आहेत, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याने दिलीय.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की, सद्यस्थितीत जे नगरसेवक आमदार आणि खासदार झालेत त्यांची माहिती देताना नाव, वेतन आणि भत्ता अशी एकूण रक्कम घेत नसल्यास त्याची माहिती देयावी.

यावर चिटणीस खात्याने अनिल गलगली यांस कळविले की, खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा रु. २५,०००/- मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. १५०/- भत्त्यासाठी अशा केवळ चार सभांकरिता दिले जाते.

अनिल गलगली यांच्या मते राजकीय पक्षाने जे नगरसेवक आमदार आणि खासदार बनलेत. त्या ठिकाणी राजीनामे घेणे गरजेचं होते. पण, दुर्दैवाने कोठल्याही राजकीय पक्षाने तो निर्णय घेतला नाही.

अशा परिस्थितीत कमीत कमी मानधन न घेण्याची सूचना करणे गरजेचं होते. मात्र, चित्र वेगळंच आहे, असे समजतंय.