TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 जुलै 2021 – मुसळधार पावसामुळे चिपळूण भागात पूरस्थिती निर्माण झाली होती या पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर भाजपकडून टीका केली जातेय. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता भास्कर जाधव यांच्या या कृतीवर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, आता संबंधित महिलेने भास्कर जाधवांना ‘रावडी राठौर’ची उपमा दिली. मात्र, नेमकं काय घडलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पूरग्रस्त महिलेला दमदाटी करतानाच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. पुरग्रस्तांविषयी चिंता, संवेदनशीलता सर्वानीच दाखवली पाहिजे. मात्र, भास्कर जाधवांनी केलेलं वर्तन हे अतिशय धक्कादायक आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला म्हणाली, अद्याप आमच्याकडे लाईट नाहीये, माझ्या मोबाईललाही चार्जिंग नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर काय अपप्रचार करत आहेत?, हे मला माहित नाही.

त्यांनी काहीही उद्धट बोलले नाही, ते जे बोलले ते वडिलकीच्या नात्याने बोलले आहेत. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. त्यांचा आवाजच ‘रावडी राठोड’ सारखा असल्यामुळे ते तसं वाटलं असेल.

भास्कर जाधव हे प्रत्येकवेळी मदत करतात. सगळ्या व्यापाऱ्यांनाही ते मदत करतात. पाहणी करताना ते मदतीच्या भावनेने आलं होते, ते काहीही वाईट बोलले नाहीत. त्यांचं बोलणंच तसं आहे. त्यामुळे, चुकीचा अर्थ काढण्यासारखं काहीही नाही, असे स्वाती भोजने यांनी म्हटलंय.

आपण कोणत्याही दबावात हे बोलत नाही. जर दबाव असता तर मी मुख्यमंत्र्यांसमोर आमदार-खासदार यांचा पगार काढला नसता, असेही भोजने यांनी नमूद केलं आहे.

नेमकं काय घडलं ?
काल चिपळूणच्या पहाणी दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचे झालेलं नुकसान व गाऱ्हाणी ऐकत होते. यावेळी स्वाती भोजने या त्यांच्या दुकानासमोर उभ्या होत्या. मुख्यमंत्री पहाणी करताना स्वाती यांच्या दुकानासमोर आले असता स्वाती यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

माझं घर गेलं… माझं दुकान गेलं… तुम्ही काहीतरी करा… असं म्हणत स्वाती यांनी आपली तक्रार मांडली. तुम्ही काय पण करा… तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी फिरवा… तुम्ही काय पण करा पण मदत करा..असे अगदी रडत स्वाती यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, “वळवतो… वळतवो..असे म्हटलं.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दमदाटीच्या स्वरामध्ये स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं.

आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव म्हणाले, हे बघा, आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. पण, त्याने काय होणार नाही.

यावेळी भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला म्हणत मुख्यमंत्र्यांसोबतच्या ताफ्यातील लोकांना पुढे जाण्याचा इशारा केला. मात्र, त्यानंतर मागे वळून पाहत, “बाकी काय?, तुमचा मुलगा कुठंय?, असं भास्कर जाधव यांनी हातवारे करुन विचारलं.

त्यानंतर स्वाती यांचा मुलगा दिसताच, आईला समजव… आईला समजव… उद्या भेट, असं भास्कर जाधव म्हणाले. या भेटीचे आमंत्रण त्यांनी दमदाटीच्या स्वरात दिले.

यावेळी स्वाती म्हणाल्या, आम्हाला किमान दुकानाच्या वरती बसायला मजला तरी आहे. आम्ही तिथे बसलो होतो. घरातल्या सगळ्या वस्तू पाण्याखाली गेल्या. एकही वस्तू राहिली नाही. आम्ही चार दिवस नुसतं दुकान साफ करत आहे, तरी ते होत नाहीये.

अजून दोन वेळा धुवून झालेत चार राहिलेत. माझी एकटीची व्यथा नाही, सर्व व्यापाऱ्यांची व्यथा आहे. कोणाचं काहीही वाचलेलं नाही. त्यांनी एवढी आश्वासने दिली आहेत, तर मदत द्यायला हवी. त्यामुळे तातडीने मदत करावी.