TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 3 जून 2021 – देशातील कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर महिना 20 कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट गाठायला हवे. तरच वर्षअखेरीस आपल्याला कोरोनाला रोखण्यात यश येईल, असा अंदाज हैदराबाद येथील एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीचे (एआयजी) संस्थापक ‘पद्मविभूषण’ डॉ. नागेश रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.

देशावरील संकटाच्या या काळात आपापसातील सर्व मतभेद आणि हेवेदावे बाजूला ठेवावेत आणि आपण कोरोनाशी लढायला हवे, असेही डॉ. नागेश रेड्डी यांनी म्हंटलं आहे.

कोविडच्या सध्याच्या उपचार पद्धतीत सध्या परदेशी पद्धतीचा प्रभाव आहे. हा उपचार भारताच्या वातावरणाशी मेळ घालत नाही. त्यामुळे आम्ही कोविडसाठी चार भागांत नवी उपचार पद्धती विकसित केलीय.

या उपचार पद्धतीच्या माध्यमातून एआयजीच्या 52 डॉक्टरांच्या पथकाने 20,000 कोविड रुग्णांवर उपचार केले. यातील 99 टक्के रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती देखील डॉ. रेड्डी यांनी दिली.

कोरोना विरुद्धची लढाई ही मानवता वाचवण्यासाठीची आहे. त्यामुळे आमच्या एआयजीने बनवलेल्या देशी उपचार पद्धतीचे पेटंट आम्ही घेणार नाही. त्याऐवजी देशकार्य म्हणून आम्ही पुस्तिका स्वरूपात या कोविड उपचार पद्धतीची सविस्तर माहिती देशातील एक लाख डॉक्टर्स आणि वैद्यकीयतज्ञांना देणार आहोत, असे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.

देशाची लोकसंख्या पाहता कुणालाही दोष देऊ नये. जूनच्या अखेरीस संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो. त्यासाठी सर्व शास्त्र्ाज्ञांनी एकत्र येऊन येणारी लाट कशी रोखता येईल? याची एक रणनीती तयार करावी, असे आवाहन डॉ. नागेश रेड्डी यांनी केलं आहे.