TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 11 जुलै 2021 – अर्थव्यवस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी चीनने रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोमध्ये अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चीनच्या बँकिंग व्यवस्थेत रोख रक्कम वाढणार असून बँका, कंपन्या किंवा ग्राहकांना अधिक कर्ज देऊ शकतील. यातून कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. कंपन्यांना आपलं आर्थिक उप्तन्न वाढविण्यास मदत होणार आहे.

याबाबत तज्ज्ञांच्या मतानुसार, चीनच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यास याचा केवळ चीन देशालाच नव्हे तर भारतासोबत जगाला फायदा होणार आहे. चीनच्या निर्णयामुळे बाजारात सुमारे 1 लाख कोटी यूआन इतका पैसा येणार आणि सोमवारी भारतीय शेअर बाजारात याचे परिणाम दिसतील. देशातील धातू उप्तादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होईल.

भारतातील सीआरआर प्रमाणे चीनमध्ये रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोची व्यवस्था आहे. चीनची सर्वोच्च बँक असलेल्या ‘सेंट्रल पीपल्स बँक ऑफ चायना’ ने यात घट करुन बँकिंग व्यवस्थेत रोख रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने रिझर्व्ह रेशोमध्ये ०.५ टक्क्यांची कपात केली असून आता नवे दर १५ जुलैपासून लागू होणार आहेत.

प्रसारमाध्यमांमधील माहितीनुसार, चीनच्या या निर्णयामुळे बाजारामध्ये सुमारे १ लाख कोटी यूआन इतकी रक्कम येणार असून याचा परिणाम आपल्याला शेअर बाजारात दिसेल.

भारतावर काय परिणाम होणार?
चीन हा देश संपूर्ण जगात धातूचा सर्वात मोठा ग्राहक आहे. अशावेळी व्याजदरात कपात झाल्याने धातूच्या दराला मोठा आधार मिळणार आहे. यामुळे जगातील शेअर बाजाराला चालना मिळणार आहे.

अमेरिकी डॉलरवर दबाव वाढल्याने भारतीय रुपयाला देखील आधार मिळणार आहे. स्वस्त दरात चीनमधील कंपन्यांना कर्ज उपलब्ध होईल. यामुळे उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. यामुळे तांबं, झिंक, शिस्याची विक्री अधिक प्रमाणात वाढेल. अशावेळी भारतीय कंपन्या याचा मोठा फायदा घेतील.

या दरम्यान, चीन व भारताची मॉनिटरी पॉलिसी थोडीफार एकसारखी आहे. चीनने ज्या वेळी व्याज दरात कपात केली आहे. त्यानंतर भारतातही व्याज दरामध्ये कपातीचा निर्णय घेतला जातो.

सध्या भारतात व्याज दरात कपातीची शक्यता कमी आहे. कारण, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अर्थव्यवस्था व शेअर बाजार यांचं एकमेकांशी नातं आहे. त्यामुळे काही देशांच्या अर्थव्यवस्थेत तेजी मिळाल्याचं दिसल्यानंतर शेअर बाजारात सुगीचे दिवस येतील.