TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 जुलै 2021 – ट्विटरने अखेर देशाचे नवे आयटी नियम स्वीकारलेत. कंपनीने आपला निवासी तक्रार अधिकारी नियुक्त केलाय. ट्विटरने अधिकृत वेबसाइटवर सांगितले आहे की, त्यांनी विनय प्रकाश यांची तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केलीय.

सरकारने २५ फेब्रुवारी रोजी नवीन कायदे लागू केलेत. हे नियम २५ मेपूर्वी म्हणजे ३ महिन्यांत पाळले जायचे होते, परंतु ट्विटरने मुदत संपदल्यानंतर ४६ दिवसांनी या नियमांचे पालन केलं आहे.

याअगोदर २७ जून रोजी ट्विटर इंडियाचे अंतरिम तक्रार अधिकारी धर्मेंद्र चतुर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नव्या आयटी नियमांचे पालन करण्यासाठी ट्विटर इंडियाने त्यांची काही आठवड्यांपूर्वी नियुक्ती केली होती.

नवे आयटी मंत्री अश्विन वैष्णव यांनी ८ जुलै रोजी मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी पहिला इशारा ट्विटरला दिला होता. ते म्हणाले की, देशातील कायदे सर्वांपेक्षा वर आहेत. ट्विटरला त्याची अंमलबजावणी करावी लागेल.

मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राजीनामा दिला होता. नवीन आयटी कायद्यासंदर्भात सोशल मीडिया कंपन्यांसमोर रविशंकर प्रसाद देशाची प्रतिष्ठा वाचविण्यात अपयशी ठरले होते. याच कारणास्तव त्यांना मंत्रालयातून काढून टाकले, असे बोलले जात आहे.