TOD Marathi

आतापर्यंत राज्यातील 1 लाख 38 हजार संस्थांची नोंदणी रद्द !; नाशिकमधील नोंदणी रद्द झालेल्या 17 हजार Trust ची मालमत्ता जप्त होणार

टिओडी मराठी, दि. 12 जुलै 2021 – नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टची मालमत्तांची पडताळणी करण्याचे निर्देश राज्याचे धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी विभागीय अधिकार्‍यांना दिलेत. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ३८ हजार ३९६ संस्थांची नोंदणी रद्द केलीय. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 17 हजार 209 विश्वस्त संस्थांची स्थावर तसेच जंगम मालमत्ता जमा होणार आहे.

महाराष्ट्रात अधिक प्रमाणावर ट्रस्ट, संस्थांची नोंदणी होते. यातील अनेक संस्था नियमानुसार ऑडिट रिपोर्ट व चेंज रिपोर्ट सादर वर्षानुवर्षे निष्क्रिय ठरत असतात. त्यांच्यामार्फत कोणतेच कामकाज होत नाही. मात्र, त्या नोंदणीकृत असल्याने धर्मादाय आयुक्तालयावर निष्क्रिय संस्थांचा बोजा मात्र वाढत असतो.

या पार्श्वभूमीवर राज्यभरात अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील सुमारे ८ लाख १७ हजार ४१६ नोंदणीकृत संस्थांपैकी आतापर्यंत १ लाख ३८ हजार ३९६ संस्थांची नोंदणी रद्द केलीय. यात नाशिकच्या १७ हजार २०९ संस्थांचा समावेश आहे.

अनेकदा नोंदणी रद्द झाल्यानंतर ट्रस्टची मालमत्ता सरकारजमा न होता, या मालमत्तेला खासगी स्वरुप देऊन तिचा वापर केला जातो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.