टिओडी मराठी, इंदूर, दि. 20 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान इंदूरमधील एका पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांच्या क्रूरतेचा गुन्हा दाखल केला आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी एका घोड्याला भाजपच्या रंगात रंगवलं.
भाजपचे माजी नगरसेवक रामदास गर्ग यांनी या घोड्याला बोलावले आहे. मात्र, अनेकांना घोड्याला रंगवलेलं आवडलं नाही आणि त्यांनी भाजपवर प्राण्यांवर क्रुरता केल्याचा आरोप लावत गुन्हा दाखल केला आहे.
पीपल्स फॉर अॅनिमल्सने याचा निषेध नोंदवला आहे. पीपल्स फॉर अॅनिमल्सचे स्थानिक प्रतिनिधी म्हणतात की, हा प्राण्यांविरोधातील क्रूरता कायदा 1960 चे उल्लंघन आहे.
याप्रकरणी पीपल्स फॉर अॅनिमल्सने जन आशीर्वाद यात्रेच्या संयोजकांविरोधाधत संयोगितागंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. यासह, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली जाणार आहे.
देशात भाजपकडून जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. मात्र, या यात्रा काही ना काही वादामध्ये अडकत आहेत. या यात्रेत अनेक ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली होतेय, असे दिसत आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सात एफआयआर दाखल केल्या आहेत.