TOD Marathi

टिओडी मराठी, जळगाव, दि. 20 ऑगस्ट 2021 – शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनेलमधील चर्चेवेळी महर्षी वाल्मिकी यांची तुलना थेट तालिबान्यांसोबत केली. त्यामुळे या त्यांच्या विधानाविरोधात जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

कोळी समाजबांधवांसह भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. मुनव्वर राणा यांच्या आक्षेपार्ह विधानाचा कोळी समाजबांधवांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातोय.

शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनलमधील चर्चेवेळी महर्षी वाल्मिकी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. याबाबत चौकशी केल्यानंतर मुनव्वर राणा यांनी रामायणकार आणि कोळी समाजबांधवांचे दैवत महर्षी वाल्मीक यांची तुलना तालिबान्यांशी केली.

तसेच त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करीत धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे कैलास सोनवणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतलाय. यावेळी भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासोबत किशोर बाविस्कर, मुकुंदा सोनवणे, नंदकुमार सपकाळे यांच्यासह कोळी समाजबांधव आदी उपस्थित होते. याप्रकरणी राणा यांना अटक करण्याचीही मागणी कोळी समाजबांधवांकडून केली आहे.