TOD Marathi

फोन टॅपिंग प्रकरण BJP ला भोवणार ? ; गृहमंत्री यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, फोन टॅपिंगमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 जुलै 2021 – आज विधीमंडळात फोन टॅपिंग प्रकरणाची करण्याची मागणी करण्यात आली, या मागणीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. तसेच पुढील अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्याचे निर्देशही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे फोन टॅपिंगचे प्रकरण भाजपला भोवणार आहे, असे समजते.

सभागृहात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. 2016-17 मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप केले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग केले, यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप केला.

हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून केले ? यामागचा सूत्रधार कोण?, याची चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांनी आज सभागृहात केली.

तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी देखील या संदर्भात गृहमंत्र्यांकडे हीच मागणी केली.

केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम करत असतील तर त्याचा परामर्श आणि त्याची काळजी व त्याबाबतीतील चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशीचे आदेश दिले.

फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार आहे. अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडली नाही, असे दिसते. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.

तसेच उद्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहितीही घेऊ, असेही दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले. यावरून फोन टॅपिंगचं प्रकरण अगोदरच्या भाजप सरकारच्या काळात झालं आहे. त्यामुळे या चौकशीमुळे भाजप अडचणीत येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.