TOD Marathi

Andheri By Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार मुरजी पटेल (BJP candidate for Andheri East assembly Murji Patel) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्षेप घेतला आहे. 2017 पासून सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी असताना त्यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला? असा आक्षेप आता शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) माजी नगरसेवक संदीप नाईक (Sandeep Naik took on candidature of Murji Patel) यांनी घेतला आहे. संदीप नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाकडून याबाबतचे पुरावे देखील देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत खोटी कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने पटेल यांच्यावर ही कारवाई केली आहे. परंतु, असे असताना देखील त्यांचा निवडणुकीचा अर्ज कोणत्या नियमानुसार स्वीकारला? असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.
2017 पासून सहा वर्षांची निवडणूक लढवण्यास बंदी असताना मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला? निवडणूक लढण्याच्या परवानगीबाबत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असताना त्यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला? असा प्रश्न संदीप नाईक यांनी उपस्थित केला आहे. या दोन्ही प्रकाराची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक असताना ही माहिती मुरजी पटेल यांच्याकडून लपवण्यात आली आहे. निवडणूक लढवण्यास बंदी असल्याने त्यांचा मतदान करण्याचा अधिकार देखील काढून घ्यावा अशी मागणी संदीप नाईक यांनी केली आहे. याबरोबरच पटेल यांच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्याची माहितीही त्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवली आहे, असाही आक्षेप नाईक यांनी घेतला आहे. बोगस चेक देण्याबाबत मुरजी पटेल यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देखील नाईक यांनी दिली आहे.
संदीप नाईक यांनी मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने हे सर्व आक्षेप फेटाळले आहेत. आक्षेप असताना देखील मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते. शिवाय आक्षेप असूनही कारवाई होत नाही, त्यामुळे या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, असा इशाराही संदीप नाईक यांनी दिला आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (An independent candidate took objection on Rutuja Latke’s application) यांच्या उमेदवारीवरही आक्षेप घेण्यात आला आहे. ऋतुजा लटके यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ईपीएफओ बॅलन्स अकाउंट नंबर आणि त्यामधील शिल्लक दाखवली नाही. असा आक्षेप अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्याकडून लटके यांच्या उमेदवारीवर घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण आहे आणि ते रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. परंतु आयोगाने मिलिंद काबळे यांची ही मागणी फेटाळली आहे.