TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 6 जुलै 2021 – जमीन लाटणे, फसवणूक करणे आणि धमकावणे अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे हा आज दुपारी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत स्वत: हून शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केलीय.

याबाबत नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयुर बर्‍हाटे यांच्यासह पिंताबर धिवार, अ‍ॅड. सुनिल मोरे यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने कारवाई केली होती.

त्यामुळे सर्व मार्ग बंद होत आहेत, असे दिसल्यावर आज रवींद्र बर्‍हाटे याने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे, असे कळविले. त्यानुसार आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला, यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.

बर्‍हाटे याचा शोध घेण्यासाठी मागील काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे प्रयत्न सुरु होते. रवींद्र बर्‍हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्याकडे अधिक प्रमाणात जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले आहेत. त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे, असे आढळून आले होते.