TOD Marathi

टिओडी मराठी, बारामती, दि. 6 मे 2021 – बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटू लता करे यांचे पती भगवान करे यांचे बुधवारी (दि ५) कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाग्रस्त झाल्याने भगवान करे यांच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी (दि.४) रात्री त्यांचे निधन झाले. त्यामुळे पतीला वाचविण्यासाठीची लता करे यांची धाव आता कायमची थांबली.

लता कारे यांना पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी आर्थिक चणचण भासत होती. म्हणून त्यांनी २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत लता करे यांनी सहभाग घेतला होता. यात त्या अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या.

लता करे यांचे पती हॉस्पीटल कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. मंगळवारी (दि ४) दुपारी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा अनिता गायकवाड हॉस्पिटलकडे जात असताना त्यांना लता करे रस्त्याने जाताना दिसल्या. त्या फार अस्वस्थ दिसल्याने गायकवाड यांनी करे यांची विचारपूस केली.

यावेळी करे यांनी माझे पती अ‍ॅडमिट आहेत. त्यांना औषधोपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे सांगितले. यानंतर गायकवाड यांनी त्यांना औषधे घेऊन दिली होती. मात्र, उपचार सुरु असताना भगवान कारे यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.

लता करे यांच्या तीन मुलींचे विवाह झाल्यावर हे कुटुंब सुमारे ९ वर्षांपूर्वी बारामतीमध्ये वास्तव्यास आहे. बुलढाणा येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने बारामतीमध्ये स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचा मुलगा एका कंपनीमध्ये चौकीदार म्हणून नोकरी करतो.