TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 6 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात चित्रपट चित्रीकरणाला आठवडाभरात परवानगी मिळणार आहे. त्याप्रमाणे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लवकरच लाईट… कॅमेरा…ॲक्शन… सुरु होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधणार आहे, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक सेलच्या शिष्टमंडळाला मंगळवारी दिले आहे.

नाट्य, चित्रपट, लोककलावंत, तंत्रज्ञ तसेच जादूगार यांनाही आर्थिक मदत करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. महाराष्ट्र सरकारने कष्टकरी वर्गाला लॉकडॉउनच्या काळात मदत म्हणून आर्थिक मदत जाहीर केलं आहे. परंतु, पडद्यामागील कर्मचारी तसेच लोककलावंतांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे नवोदित कलाकारांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

नाट्यप्रयोग, चित्रपट आणि चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे या वर्गाचे हाल होत आहेत. तसेच मागील वर्षी मार्चपासून राज्यात चित्रीकरणाला बंदी होती. नोव्हेंबरच्या अखेरीस ती उठविली. परंतु, आता पुन्हा बंदी घालली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण परराज्यात होत आहे. याचे वृत्त एका प्रसारमाध्यमांनी नुकतेच दिले होते. ते पुनर्वसन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. चित्रीकरणाच्या सेटवर सर्व प्रकारची काळजी घेऊन ते करणे शक्य आहे, असे सेलचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी त्यांच्या निदर्शनास आणले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल कलाकारांना आर्थिक पॅकेज लवकरात लवकर जाहीर करावे. तसेच शूटिंगला सुद्धा लवकरात लवकर परवानगी द्यावी, यासाठी नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश-चित्रपट व सांस्कृतिक विभागतर्फे निवेदन देण्यात आले होते. हे निवेदन दिल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लवकरच पुढच्या आठवड्यात आम्ही शूटिंगला परवानगी देऊ. तसेच शूटिंग लवकर सुरू करण्या संदर्भातील आमच्या हालचाली करू आणि लवकरच आदेश जारी करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.