टिओडी मराठी, पुणे, दि. 18 जुलै 2021 – गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे – सासवड रस्त्यावर गांजा विक्रीसाठी मोटारीतून आलेल्या तस्कराला पकडून त्यांच्याकडून ४० किलो गांजा जप्त केलाय. त्यासह त्याला विक्रीसाठी हा गांजा देणारी मुख्य सूत्रधार महिलेला अटक केलीय.
सचिन नरसिंग शिंदे (वय ३३, रा. रामलिंग रोड, ता. शिरुर) व भाग्यश्री बाबुराव घुगे (वय ४०, रा. शिरुर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख १० हजारांचा गांजा, मोटार आणि मोबाईल असा १३ लाख २९ हजार रुपयांचा माल जप्त केलाय.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे एक पथक गस्तीवर असताना हवालदार मनोज साळुके यांना अशी माहिती मिळाली होती की, सातववाडी हडपसर बस थांब्यासमोरील सार्वजनिक रोडवर एकजण व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी यांच्या पथकाने सापळा रचून सचिन शिंदे याला वाहनासह ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी करून वाहनाची झडती घेतली असता सुमारे ४० किलो गांजा मिळाला. त्याने तो गांजा त्याची शिरुर येथील मालकीण भाग्यश्री घुगे हिच्याकडून आणला आहे, असे पोलिसांना सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी एक पथक मालकीण भाग्यश्री घुगे हिच्या घराकडे रवाना करून तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
भाग्यश्री हिचा पती ही गांजाची तस्करी करीत आहे. तो सध्या हैद्राबाद इथल्या गुन्ह्यात कारागृहात आहे, असे पोलिसांनी सांगितले. गाजांची तस्करी करताना तेथील स्थानिक पोलिसांनी त्याच्यावर ८ महिन्यापूर्वी कारवाई केलीय. तर सचिन शिंदे याच्यावर देखील जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.