TOD Marathi

टिओडी मराठी, जेजुरी, दि. 18 जुलै 2021 – जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार केलेल्या 349 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन आणि संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्‍यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

या दरम्यान, मंदिर परिसराचा जीर्णोद्धार करताना मूळ मंदिरामध्ये बदल होऊ न देता जुन्या पद्धतीचा दृष्टीकोन समोर ठेवून विकासकामे करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या आहेत.विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या सभागृहामध्ये जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक झाली. त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

विकासकामे करताना कमीत कमी वेळेत काम पूर्ण होतील. याची दक्षता सर्व विभांगांनी घ्यावी. विश्‍वस्त व स्थानिक लोकांना विश्‍वासात घेऊन सर्व विभागांनी विकासाची कामे करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यात.