TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 18 जुलै 2021 – कोकण भागात पावसाने शनिवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा जोरदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांतील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. चेंबूर भागामध्ये मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळली आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून 16 जणांचे रेस्क्यू केले आहे. या घटनेत चार ते पाच घरे पडली आहेत.

याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने अशी माहिती दिली आहे कि, चेंबूर इथल्या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढून 17 वर गेलाय. तर 2 जखमींना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी दिली आहे.

याशिवाय फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.

विक्रोळीत इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू :
मुंबईमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागात एक इमारत कोसळली आहे. DCP (झोन 7) चे प्रशांत कदम यांनी सांगितले कि, या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 5 ते 6 लोक अडकले आहेत, अशी शक्यता आहे.

या भागात पाणीपुरवठा होणार नाही :
तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काहीजण जखमी झाले आहेत. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झालाय. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत काही भागाला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने सांगितले आहे.

रेल्वे वाहतुकीवरही परिणाम :
मध्यरात्री झालेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झालीय. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस व मेल रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.

कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झालीय. बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेगाड्या कल्याण स्टेशनवर थांबविल्या आहेत. तसेच पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे, असे सांगितले जात आहे.

रेल्वे रुळ पाण्याखाली :
दुसरीकडे कांदिवली पूर्व भागातही जोरदार पाऊस पडल्यामुळे रहिवासी भागात पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांची झोपमोड झाली, याशिवाय त्यांना संसार वाचवण्यासाठी धावपळही करावी लागली.

तसेच सायनचे गांधी मार्केट परिसरातही पाणी साचले. सायनला पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. तर, दुसरीकडे मध्य रेल्वेच्या सायन स्थानकात पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत.

मुंबई जिल्ह्यातील आणखी मुसळधार पावसाची शक्यता :
जोरदार पावसामुळे मुंबईतील हिंदमातासह इतर सखल भागांत पाणी साचले आहे. मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे.

दरम्यान, बोरिवली पूर्वेकडील शांतीवन भागात दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.