टिओडी मराठी, बेहरामपूर, दि. 10 जुलै 2021 – केंद्र सरकारने यंदा म्हणजे 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत सुमारे 69 वेळा इंधन दरवाढ करून सुमारे 4 लाख 91 हजार कोटी रूपये कमावले आहेत, असा दावा लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांनी केलाय. या दरवाढीतून सामान्य माणूस चिंबला आहे. त्यांना दिलासा दिला पाहिजे होता, असे काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांनी म्हटले आहे.
छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने इंधनावरील व्हॅट काढून टाकून सामान्य माणसांना दिलासा दिलाय. तसा दिलासा पश्चिम बंगालनेही द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. छत्तीसगड सरकारने व्हॅट काढून टाकल्याने तेथील पेट्रोलचा दर 12 रूपयांनी कमी झालाय, असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.
काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी म्हणाले, सर्वच प्रकारच्या महागाईने सामान्य माणूस त्रस्त झालाय. सगळीकडे पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही 850 रूपयांपर्यंत गेलेत.
पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट काढून टाकल्यास राज्याला तेराशे ते चौदाशे कोटी रूपयांचा तोटा होईल. पण, ज्या सरकारला राज्यातील जनतेने इतक्या प्रचंड बहुमताने जिंकून दिले आहे, त्यांच्यासाठी हा खर्च सहज परवडण्यासारखा आहे, असे काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी म्हणाले आहेत.