TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जुलै 2021 – महागाईने अगोदर हताश झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. एसटीची भाडेवाढ होणार आहे, असं संकेत मिळाले आहेत. ही भाडेवाढ डिझेल दरवाढीमुळे केली जाणार आहे, असे एसटी कडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात एसटीकडून प्रस्ताव सादर केला आहे.

कोरोनामुळे अगोदर पूर्ण क्षमतेने एसटीची सेवा सुरु झालेली नाही. तसेच लॉकडाऊनचे निर्बंध अजून असल्याने अनेक मार्गावरील बसेस बंद आहेत. हा भार असताना डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे एसटीवर महिन्याला सुमारे 120 ते 140 कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे एसटीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा हा प्रस्ताव तयार केलाय.

याअगोदर जून 2018 मध्ये एसटीने 18 टक्के भाडेवाढ केली होती. आता पुन्हा ही भाडेवाढ होणार असल्याने तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या 15 ते 16 हजार बसेस डिझेलवर धावत आहेत. पूर्ण क्षमतेने एसटी धावत असतात, तेव्हा राज्यात दिवसाला एसटीला 12 लाख 500 लीटर डिझेल लागत असते.

सध्या महामंडळाच्या 10 हजार बसेस धावत आहेत. त्यासाठी 8 लाख लीटर डिझेल एसटीला दिवसाकाठी लागत असते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या 38 टक्के म्हणजेच 3 ते 4 हजार कोटी रुपये केवळ इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून दिली आहे.