TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात कोरोनाने कहर केला असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात सुमारे 16 हजार पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना हि माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कि, आरोग्य विभागातील 16 हजार पदे तातडीने भरणार आहेत. या 16 हजार पदांमध्ये क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. तर, अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार अशी 4 हजार पदे भरणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये येईल. त्याची पूर्वतयारी राज्य शासनाकडून केली जातेय. प्रत्येक जिल्ह्याला त्याबाबत स्पष्ट सूचना दिलेली आहे. बेड, ऑक्सिजन तसेच मनुष्यबळाच्या बाततीत आपण सज्ज असले पाहिजे, असे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.