TOD Marathi

गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. (CM Eknath Shinde orders to BMC Commissioner) गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग घेत असलेल्या खबरदारीचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली.

ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलवणार नाही याची काळजी घ्या. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (CM Ekanth Shinde discussed with Health Minister)

गेल्या काही दिवसात मुंबई शहरात गोवरचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. यासाठी काही बालकांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. गोवरचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाच्या वतीनेही आवश्यक प्रयत्न केले जात आहेत.